मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

सोमवार, 18 अगस्त 2008

हुषार गणिती -01

हुषार गणिती
-लीना मेहेंदळे
Lokmat dt 3 jan 2009
kept on son_denare_pakshi/lokmat
सुटी संपली. शाळा सुरु झाली की नवीन वर्ग, नवीन पुस्तकं, नवे शिक्षक आणि कांही नवी मित्रमंडळी पण मिळतात. मग त्यांच्यासाठी नव्या गोष्टी हव्याच.

एका हुषार गणिती माणसाने एक गोष्ट रचली. म्हणे एक श्रीमंत शेठ होता. अफाट संपत्ती आणि सतरा हत्ती बाळगणारा. मरतांना त्याने आपली संपत्ती तीन मुलांना वाटली. त्यामध्ये इतर कुठे अडचण नव्हती. पण हत्तींबाबत त्याने लिहून ठेवले होते की, मोठया मुलाला 1/2, मधल्या मुलाला 1/3, आणि धाकटयाला 1/9 हत्ती द्यावेत. हे कस करणार? (गणितात हुषार कोण कोण आहेत तुमच्यापैकी ? चालवा डोकं ---- एक, दोन, पांच मिनिटच फक्त हं !)

मग समस्या गेली राजाकडे. त्याचा एक बुध्दिमान मंत्री होता. त्याने आपला एक हत्ती आधी मुलांना देऊ केला. आता झाले अठरा हत्ती. त्यातले मोठया मुलाला 1/2 म्हणजे नऊ, मधल्याला 1/3 म्हणजे सहा व धाकटयाला 1/9 म्हणजे दोन हत्ती दिले आणि आपला हत्ती परत घेतला.

ही गोष्ट खूप गाजली. लोकांना खूप आवडली. त्यांनी एकमेकांना आवडीने ऐकवली. खूप वर्ष गेली. मग अजून एका हुषार गणितीला वाटल, अरे, आपण ही गोष्ट वाढवू शकतो. त्याने पुढे भर टाकली. ती अशी ---

मंत्र्याच्या न्यायाने सगळे खूष झाले असतानाच मोठया मुलाला वाटले छे:, सगळे हत्ती आपल्यालाच मिळायला हवेत. त्याने राजाकडे निवेदन दिले. सतरा हत्तींचे वाटप पुन्हा करा - ही पध्दत मला पसंत नाही. राजा चिडलाच. पण राग न दाखवता त्याने मंत्र्याला बोलावले. दोघांनी आपसांत कांही कुजबूज केली. मग दरबार भरला तो गांवातील नदीच्या पुलाजवळ. आता मंत्र्याने सांगितले - ते माझा हत्ती घेऊन केलेले वाटप विसरा. आता मी नव्याने वाटप करतो.

त्याने नदीच्या पुलावर एक हत्ती आणि पुलाखाली दोन हत्ती उभे कले - हे बघा, एकाखाली दोन म्हणजे 1/2 हत्ती. - इथे पुलाने आडव्या रेघेचे काम केल आहे. हा वरचा एक आणि खालचे दोन हत्ती मोठया मुलाचे. मग पुलावर एक आणि खाली तीन हत्ती ठेऊन म्हणाला हे 1/3 म्हणजे चार हत्ती मधल्या मुलाचे. शेवटी पुलावर एक आणि खाली नऊ हत्ती ठेऊन म्हणाला हे 1/9 म्हणजे दहा हत्ती धाकटया मुलाचे. सगळया जनतेने आणि दरबाराने म्हटले - ठीक, ठीक, आता चांगला न्याय झाला. कारण लोभी माणसांना अद्दल घडवणे हे पण न्यायाचे काम असतेच.

अशाच खूप गोष्टी, खूप कोडी, खूपशा अभ्यास करण्याच्या युक्त्या वगैरे वगैरे आपण बोलूया. तुमच्याकडील प्रश्न, युक्त्या आणि गोष्टी मला कळवा. त्याही आपण या सदरातून सर्वांना सांगू. विषय असतील परिसर, विज्ञान, पर्यावरण, आकाश, ऋतू, फुलं, पाखर .. .. असे खूप काही. दर आठवडयाला एक.

तुम्ही वाचल असेल - जगात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढतय म्हणून जागतिक तापमान वाढतय. त्यातून त्सुनामी सारखी वादळं येतात.. .. तर मुद्दा हा - वातावरणात कार्बन डायऑक्साइडच प्रमाण किती होत - दहा वर्षांपूर्वी किती आणि शंभर वर्षांपूर्वी किती, हे आता मोजायच असेल तर कस मोजतात? शोधा याचं उत्तर.किंवा थोडी वाट बघा, आणी
याच ठिकाणी पुन्हा कधीतरी मी ती युक्ती पण सांगेन.

तसच तुमच्या शहरात कांही कांही ठिकाणी ट्रॅफिक जाम मुळे धूर, प्रदूषण खूप वाढते. तिथल्या पोलीस कॉन्स्टेबल्सना मास्क लावावा लागतो. तिथे आता कांही लोक प्रदूषण मापक यंत्र बसवतात - म्हणजे लोकांना कळाव - की पहा इथे प्रदूषण किती वाढलय्‌. पण हे कळल्यावर सुध्दा लोक गप्पच बसले - त्यांनी आणि प्रशासनाने मिळून कांहीच केले नाही तर कांय? मुलं काय करू शकतात ?

त्याच छोटस उत्तर आहे. सई परांजपे यांच्या चकाचक नावाच्या सिनेमात. बघाच तो.

आता बाय्‌ बाय्‌. पुन्हा भेट पुढल्या आठवडयांत.

-----------------------------------
Also on http://www.geocities.com/son_denare_pakshi/hushar_ganiti.html
ALso the mangal and pdf files.

मंगलवार, 5 अगस्त 2008

अंतरिक्ष यात्रा

अंतरिक्ष - यात्रा

एका शहरात एक सुखी परिवार होता - रघुवीर, त्यांची पत्नी उर्मिला आणि तीन गोंडस मुल - प्रेमा, शकुन आणि नितिन. मुलं अभ्यासात हुषार होती. खेळातही प्रवीण होती. प्रेमा बरीच मोठी आणि समजूतदार होती. तिच कधी कुणाशी भांडण होत नसे. उलट इतरांची भांडण झाली तर सोडवायला आणि समजूत घालायला सगळे तिचीच वाट बघत. कुणाला अभ्यासात मदत हवी असेल तर तेही तीच करत असे.

पण शकुन आणि नितिनच तस नव्हत. त्यांच्यात अंतर कमी होत. त्यामुळे त्यांच्यात सारखी भांडण होत असत. ते सोडवतांना उर्मिलेच्या नाकी नऊ येत. दोघांना खेळायला तेच खेळण हव असे आणि वाचायला तेच पुस्तक. शिवाय दोघांना वेगळया ठिकाणी नेल तर त्यांना चालत नसे. दोघांची मिळून एक स्वतंत्र खोली होती. तिथे बसून एकत्र अभ्यास, एकत्र खेळ आणि खूप भांडण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. भांडण झाले की उर्मिला वैतागून जायची. शकुनला म्हणायची - शकुन, लहान भावाला कां त्रास देतेस - त्यांच्याशी भांडू नकोस.

दोघांना एकच खेळण हव असेल तर उर्मिला म्हणायची - शकुन, तुझा लहान भाऊ आहे, देऊन टाक त्याला ते खेळण. शाळेत जातांना नितिन कुठे इकडे तिकडे रेंगाळला तर शकुनला ऐकाव लागत असे - छोटया भावाला सांभाळून शाळेत नाही नेऊ शकत? आणि कधी चुकून माकून शकुनने त्याला थप्पड मारली तर सगळयांचाच ओरडा खावा लागे - छोटया भावावर हात उगारलास?

एकूण कांय तर या घरांत शकुनला नेहमीच ऐकून घ्याव लागत असे. प्रेमा वयाने बरीच मोठी - ती कॉलेजात जाणारी, तिच विश्र्व वेगळ. तिच्या मित्र-मैत्रिणी, तिची अभ्यासाची आणि इतर वाचनाची पुस्तकं, तिचे कार्यक्रम आणि सहली, या सर्वांत शुकनला अजून जागा नव्हती. कांही वर्ष थांबाव लागणार होत. ती ज्या वयांत होती, त्या वयातला जोडीदार नितिनच होता. तो तिचा लाडका भाऊ होता. तिच्या बरोबर खेळायला, अभ्यासला आणि भांडायला पण तोच होता. त्या भांडणांच शकुनला कांहीच वाटत नसे. पण तिची तक्रार होती इतरांबद्दल - आई, बाबा, आजी, प्रेमा, शाळेचे शिक्षक | कारण कोणत्याच भांडणात ते तिच्या बाजूने बोलत नसत. प्रत्येक वेळा तिलाच ऐकाव लागे - तुझा लहान भाऊ, करुन ते त्याच काम. लहान भाऊ आहे - जे मागतोय्‌ ते देऊन टाक. लहान भाऊ आहे - त्याच्यावर हात उगारु नकोस.

एकदा त्यांचे मामा त्यांच्या गांवी आले. ते खूप वर्षांनी स्वीडन मधून आले होते. येतांना सगळयांसाठी खूप खूप वस्तु, चॉकलेटस्‌, खेळणी, खाद्यपदार्थ, गोष्टीची पुस्तक घेऊन आले होते. खेळण्यांमध्ये एक विमान होत शकुनसाठी आणि एक रणगाडा होत नितिनसाठी.

आधी शकुनला तो रणगाडाच हवाहवासा वाटला. तो सुळकन्‌ दिशा बदलायचा. तोळा उडवायच. झालाच तर उपडा होऊन पुन: सरळ व्हायचा. तिने नितिनकडे रणगाडा मागितला पण त्याने सरळ नकार दिला.

मग तिने विमानातच मन गुंंतवल. विमान घेऊन ती कल्पना करु लागला की हे विमान खरोखरीच उडू शकत. हे मला कुठेही नेऊ शकेल. दिल्ली, कलकत्ता, किंवा ढगांच्या पलीकडे, किंवा चंद्रावर! होयच मुळी, हे विमान तर मला चंद्रावर घेऊन जाईल.

हे शेवटच वाक्य ती मोठयाने बोलली. नितिनने ते ऐकल. चंद्रावर घेऊन जाणारं विमान! मग ते मला पण हव. त्याने शकुनकडे विमान मागितल. झाली भांडणाला सुरुवात!

बाहेर वसलेल्या मोठया माणसांनी आतून भांडायचे आवाज ऐकले आणि सवयीप्रमाणे उर्मिला म्हणाली - शकुन, तुझा लहान भाऊ आहे. भांडू नकोस. देऊन टाक त्याला विमान.

पण आज शकुन खूपच चिडलेली होती. ती म्हणाली - नाही देणार. तो तर आयुष्यभर माझ्यापेक्षा लहानच राहील. म्हणजे कांय माझ्या सगळया वस्तू त्याला देऊन टाकायच्या?

प्रेमाने हा प्रश्न ऐकला आणि तिच्या मनांत एक वेगळाच विचार चमकला. मामांनी तिच्यासाठी आणलेल्या पुस्तकांत तिने नुकतीच आइन्स्टाइनची गोष्ट वाचली होती. अल्बर्ट आइन्स्टाइन हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच महान वैज्ञानिक म्हणून गाजले. त्यांना नोबेल पारितोषकही मिळाले. त्यांनी जगातली बरीच कोडी सोडवता येतील अशा एका सिध्दातांची मांडणी केली होती. थियरी ऑफ रिलेटिव्हिटी. जगांत फिरणा-या सर्व वस्तू - चंद्र, सूर्य, पृथ्वी, नक्षत्र, सौरमालिका - सगळे एकमेकांच्या सापेक्ष वेगाने फिरत असतात. त्यांना पहाणारा माणूस, त्यांच्यावर प्रयोग करणारा माणूस, तोही वेगाने फिरतच असतो. अशा सापेक्ष गतीला आपले साधे नियम लागू पडत नाहीत. वेगळे नियम लागू पडतात. प्रकाशाच्या वेगाचेही एक आगळेवेगळे महत्व असते - असा कांहीसा तो सिध्दांत होता. तो कांही प्रेमाला खूप नीटसा उलगडला नव्हता. पण त्या सिध्दांतावरुन एक निष्कर्ष असा निघत होता की, जर कोणी व्यक्ती खूप वेगाने फिरणा-या रॉकेटमध्ये बसून खूप लांबचा प्रवास करुन आली तर परत आल्यावर तिचे वय कमी वाढलेले असेल - पण त्याच काळात पृथ्वीवरच्या माणसांचे वय नेहमी सारखेच वाढलेले असेल.

थोडक्यांत जर शकुनला एखाद्या रॉकेटमध्ये बसवून लांबच्या अंतरिक्ष यात्रेला पाठवले तर परत आल्यावर ती नितिनपेक्षा लहान झालेली असेल. मग तिला रोज रोज ऐकाव लागणार नाही - तो लहान भाऊ आहेना!

मग कांय? तिने मामांना आपला विचार बोलून दाखवला. दोघांनी चर्चा करुन ठरवल - हे करायच. त्यांनी जगभरातल्या अंतरिक्ष संस्थांची मदत घेतली. खूप पत्रव्यवहार झाला. तयारी झाली आणि शेवटी एक दिवस खरोखरच शकुन अंतरिक्ष यानात बसून उड्डाण करुन गेली. आता ती पाच वर्षानंतरच परत येणार होती.

शकुनच्या परतीचा दिवस जवळ येऊ लागला तस घरात आनंदाच वातावरण तयार झाल. एव्हाना प्रेमाच लग्न होऊन गेल होत आणि नितिनही आता कॉलेजात जाऊ लागला होता. घरात सगळयांना उत्सुकता होती की शकुन येईल ती कशी दिसेल. तिने देशालाही सन्मान मिळवून दिला होता. तिचे अंतरिक्ष यान उतरण्यासाठी दिल्लीजवळ एक खास अंतरिक्ष स्टेशन बनवले होते. खुद्द पंतप्रधान तिचे स्वागत करणार होते. वैज्ञानिकांनी तिला खूपसे फोटो घ्यायला सांगितले होते, तशीच इतर बरीचशी वैज्ञानिक निरीक्षणेही तिने करायची होती. पेपरांमध्ये तिचे फोटो झळकत होते. तिला अंतरिक्ष भ्रमणाला का पाठवले - ती गोष्टही झळकली होती. ती नितिनपेक्षा लहान व्हावी. मग तिला सारख ऐकाव लागू नये - तो तुझा लहान भाऊ ना!

तोही दिवस उजाडला. शकुनचे अंतरिक्ष यान पृथ्वीवर टेकले. तिचे जंगी स्वागत झाले. सर्वांत आधी वैज्ञानिकांनी तिचा ताबा घेतला. त्यांची सगळी उपकरण, फोटो, निरीक्षणांची वही वगैरे त्यांना सोपवून झाली. मग पत्रकार. मग इतर मान सन्मान. शेवटी सर्व समारंभ संपवून शकुन एकदाची घरी आली.

ती अवकाशांत गेली तेंव्हा बारा वर्षांची होती आणि नितिन दहा वर्षांचा. आता पांच वर्षांनंतर तो झाला होता. पंधरा वर्षांचा पण शकुनच वय मात्र दोनच वर्षांनी वाढल होत. ती लहान झाली होती.

घरी खूप नातेवाईक, शिक्षक, मित्र-मैत्रिणी गोळा झाले होते. बाहेर बसून सगळयांचा गप्पा चालू होत्या.

नितिन तिला त्यांच्या खोलीत घेऊन गेला. इथेच त्यांचा अभ्यास, खेळण, आणि भांडण होत असे. जिकडे-तिकडे नितिनची पुस्तक आणि सामान पसरलेल होते. मात्र, तिच्या पलंगाशेजारी दोन कपाटात तिची पुस्तक, खेळ आणि कपडे व्यवस्थित रचून ठेवले होते. तिच्यासाठी नुकत्याच सर्वांनी आणलेल्या भेटवस्तूही पलंगावर रचलेल्या होत्या. नितिन तिला सर्व दाखवू लागला. त्यांच्यांत नेहमी सारख्याच गप्पा होऊ लागला आणि एका पुस्तकावरुन नेहमीसारखच भांडण सुरु झाल.

बाहेरुन ऊर्मिलाने भांडणाचा आवाज ऐकला आणि नेहमीप्रमाणे शकुनला रागावली. शकुन - त्याच्याशी भांडतेस? तो तुझा मोठा भाऊ आहे आता! त्याच ऐकत जा. भांडण थांबव. शकुन म्हणाली - तो तुझा मोठा भाऊ आहे - पण आता तो जन्मभर माझा मोठा भाऊच रहाणार. म्हणजे कांय तू जन्मभर त्याचीच बाजू घेणार?

हा तिचा प्रश्न प्रेमाने ऐकला आणि मामांनी पण ऐकला. ते विचार करत आहेत - आता नितिनला अंतराळ यात्रेवर पाठवून द्यावे कांय? तुम्हाला कांय वाटते ?

*********
To go on ye_ye_pawsa