मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

मंगलवार, 28 अक्टूबर 2008

ना परतीची वाट -02

ना परतीची वाट
Lokmat dt 10 jan 2009
kept on son_denare_pakshi
पंचतंत्रात एक खूप छान कथा सांगितली आहे. एक म्हातारा सिंह शिकार जमेना म्हणून तळयाच्या काठाशी राहू लागला. पाणी प्यायला छोटे जनावर आले की तो त्याला मारुन खाऊ शकत असे. एकदा एक कोल्हा त्या जागी आला. दुरुनच निरखून पाहिले तो त्याला कळले की इथे प्राण्यांची जी पावले उमटली आहेत ती फक्त तळयाकडे जाणारी आहेत, तिकडून परत येणारी पावल दिसतच नाहीत. ही “ना परतीची वाट” आपल्याला नको, अस म्हणून कोल्हा तिथून दुसरीकडे निघून गेला, असे त्याचे प्राण वाचले.

तुम्हाला ना परतीच्या वाटेची पुष्कळ उदाहरण माहीत असतील. मोजू या तर. खूपसे रस्ते वन-वे असतात. कित्येक इमारतींना इन-गेट वेगळे आणि आऊट-गेट वेगळे असते. ही झाली दोन उदाहरणे. सर्व व्हॉल्वस्‌ हे याच उपयोगासाठी असतात - की द्रव पदार्थांचा प्रवाह फक्त एकाच दिशेने होऊ द्यायचा, त्यांना उलट दिशेने जाऊ द्यायचे नाही. आपल्या हदयातील रक्त वरच्या कप्प्यांतून खालच्या कप्प्यांत जाते तिथे असाच व्हॉल्व असतो. शिवाय तुम्ही ऑस्मोसिसच्या (osmosis) धडयापर्यंत पोचला असाल, तर तेही असेच एक उदाहरण आहे. कांही पडदे असे असतात की जे एखाद्या द्रव पदार्थाला फक्त एकाच बाजूने जाऊ देतात पण परत येऊ देत नाहीत. आपल्या शरीरांतील सेल्स वरील आवरण अशाच प्रकारचे असते, आणी ते आवरण ऑस्मोसिस ची क्रिया करून सेल मधे सोडियम, पोटॅशियम आदि चे घटक किती प्रमाणांत जाऊ द्यायचे त्यावर नियंत्रण ठेवते.

साधीशी वाटणारी काच पण उष्णतेच्या बाबतीत अशीच “ना परतीची वाट” ठरते. काचेच्या घरावर सूर्याची किरणे पडली की त्या किरणांची उष्णता आणि दृश्यता (प्रकाश) दोन्हीं काचेतून आत जातात. मात्र, उष्णता बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे कांचेच्या घरातले तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा जास्त असते. युरोपिय देशांमध्ये खूप थंडी पडते, तिथे याचा छान उपयोग केला जातो. तिथे घरांना मोठया-मोठया कांचेच्या खिडक्या लावतात, म्हणजे आत येणारी उष्णता टिकून रहाते. तसेच भाजीपाला, फळे, फुले पिकविण्यासाठी कांचेची घरे तयार करतात. म्हणजे आतल्या वनस्पतींना ऊब मिळून ती हिरवीगार व ताजीतवानी रहातात. थंडीने मरुन जात नाहीत. याला ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतात.

कर्बवायू म्हणजे कार्बन डाय ऑक्साइड देखील सूर्य किरणांसाठी अशीच ना परतीची वाट तयार करते. पृथ्वीच्या वायुमंडळात जेवढे जास्त कार्बन डाय ऑक्साइड असेल तेवढया जास्त प्रमाणात सूर्य किरणांची उष्णता आत (पृथ्वीवर) येऊ दिली जाईल पण बाहेर जाऊ दिली जाणार नाही. अशाप्रकारे लाखो वर्षांपूर्वी ज्या काळात बर्फ युग (ice-age) होते व थंडीमुळे जीवसृष्टीला जगायची मारामार होती तेंव्हा कार्बन डाय ऑक्साइडच्या या गुणधर्मामुळे हळूहळू पृथ्वीवरील थंडी कमी होऊ लागली आणि जीवसृष्टीची भरभराट झाली. पण........

पण गेल्या लाखो वर्षांत पृथ्वीवरचे तापमान हळूहळू वाढतच राहिले. इतके की आता नको तो कार्बन डाय ऑक्साइडचा गुणधर्म असे सगळयांना वाटू लागले. कार्बन डाय ऑक्साइडचे नांव पडले ग्रीन हाऊस गॅस (GHG) . त्याचा जीएचजी इफेक्ट आता सर्वांना नकोसा झाला आहे. पण गुणधर्म थोडाच बदलता येणार. त्याला उपाय म्हणजे पृथ्वीवरचा कार्बन डाय ऑक्साइड कमी करणे हाच.

तर आता तुम्हाला होमवर्क असे की, पृथ्वीवरील कार्बन डाय ऑक्साइड कशा कशामुळे वाढते. त्याची यादी तयार करा आणि कशामुळे कमी होऊ शकते ती पण यादी करा. तसेच पृथ्वीवर कार्बनचा किती साठा आहे आणि तो कुठे कुठे आहे ती पण माहिती घ्या. आणि मोठ्ठं कोडं –पृथ्वीवर कार्बन डाय ऑक्साइड किती वाढला हे कसं मोजतात ?

आपल्या जीवसृष्टीला कार्बन-जीवसृष्टी म्हणतात. कारण कार्बन चेनने बनलेले कित्येक अणु-रेणू हेच आपल्या शरीराचे मूल घटक असतात हे मात्र विसरायचे नाही.

कोड्याचं उत्तर तपासूया पुढच्या कांही आठवडयांत.
-------------------------------------------------------
Also on http://www.geocities.com/son_denare_pakshi/na_partichi_vat.html
ALso the mangal and pdf files.