पिंडारी -काफनी ग्लेशियर्स -- एक थरारक ट्रेक
हृषीकेश --
उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही मुले मोकळी असतो. शाळेची कटकट नसते. सुटीतल्या ट्युशन्स नसतील तर तीही कटकट नसते. उलट आपल्यापैकी काहींना सुटीत “वेळ कसा घालवावा” हीच काळजी पडलेली असते.
यासाठी म्हणजे वेळ घालवायला व निसर्गाचे खरे सौंदर्य बघायला ट्रेकींग (गिर्यारोहण) हे एक स्वाभाविक उत्तर. ट्रेकींगमध्ये डोंगराच्या मोकळ्या हवेत चालणे होते, आंरामात गप्पा मारत, मजेत वेळही जातो व खऱ्या निसर्गसौंदर्याची जाणीवसुध्दा होते. यात धाडस अर्थातच असते.
ट्रेकिंग ग्रुप खूप असतात. हे ग्रुप सर्व ट्रेकींगची व्यवस्था करतात. अशा ट्रेकवर आपला मित्रपरिवारही वाढतो. आपण इतर खुप लोकांनाही भेटू शकतो.
पुण्यात एक “युवाशक्ती” नामक ट्रेकींगचा ग्रुप आहे. हे लोक ट्रेकचे आयोजन करतात. यापैकी सारखे होणारे ट्रेक म्हणजे महाबळेश्वर, कात्रज, सिंहगड इत्यादी. युवाशक्तीतर्फे हिमालयातसुध्दा खुप ट्रेक होतात. ते म्हणजे मनाली, रोहतांग पास (हिमाचल), नैनिताल, पिंडारी, काफनी (कुमाऊँ), Valley of Flowers (उत्तर प्रदेश) व एव्हरेस्ट बेस कॅम्प (नेताळ) पुढच्या वर्षी युवाशक्तीतर्फे मसुरीलासुध्दा ट्रेक होणार आहेत.
त्यांच्याचबरोबर या वर्षी मी PK म्हणजे पिंडारी- काफनीचा ट्रेक करुन आलो. असे ट्रेक१४ / १५ दिवसांचे असतात. पुणे स्टेशनवरून झेलम एक्सप्रेसने दिल्लीपर्यंत मनाली, पिंडारी- काफनी व व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या बॅचेस जातात. तिथून पुढे हिमाचल टुरिझमच्या बसने मनाली व प्रायव्हेट टुरिस्ट बसने PK व V.O.F. च्या बॅचेस जातात.
बेस कॅम्पपासून पिंडारी ग्लेशियर्सपर्यंत डोंगरातून ट्रेकींग करावे लागते, डोंगरातून व बर्फातून चालावे लागते.
आमच्या ३० जाणांचा मुला-मुलींचा ग्रुप पुण्याहून झेलम एक्सप्रेसने निघाला. या ग्रुपमध्ये साधारणतः १२ ते ५० या गटातील लोकांना घेतात. पण ह्या वयोमानाकडे कोणी लक्ष देत नाही. आताच्या बॅचमध्ये एक ४ वर्षाचा मुलगा आला होता. जेव्हा मी मनालीला गेलो तेव्हा तर एक ८३ वर्षाचे “आजोबा” आले होते. ते सर्वांबरोबरच चालायचे. असे जेव्हा होते तेव्हा तर वयोगट “४ ते ८३ कोणीही” असे आपण म्हणू शकतो.
आम्ही २१ तारखेला रात्री १०.३० वाजता दिल्ली स्टेशनवर पोहोचलो. रात्री “सुविधा डिलक्स” नावाच्या हॉटेलमध्ये उतरलो. हे दिल्ली स्टेशनवरुन ५ मिनिटांच्या चालायच्या अंतरावर आहे. पुढच्या दिवशी प्रायव्हेट टुरिस्ट बसमधून आम्ही नैनितालला गेलो. तेव्हा तर नैनिताल बघायला आम्हाला वेळ मिळाला नाही. रात्री उशिरा पोहोचलो व सकाळी लवकर बागेश्वर करता निघालो.
नैनितालला आम्ही KMVN म्हणजे “कुमाऊँ मंडल विकास निगम” च्या गेस्टहाऊसमध्ये थांबलो होतो. खोलीच्या खिडक्यांमधून नैनिताल लेकचे उत्तम दर्शन होत होते.
आम्ही बागेश्वरला संध्याकाळी ४ वाजता पोहोचलो. तिथला कुमाऊँ टुरिस्ट बंगला म्हणजेच आमचा बेस कॅम्प. कॅम्पला आम्हाला रकसॅक मिळाल्या. माझी स्वतःची सॅक असल्याने मी ती रकसॅक घेतली नाही. प्रत्येक कॅम्पवर आम्हाला स्लिपींग बॅग मिळाल्या.
कुठल्याही अशा ट्रेकवर पाठीवरचे ओझं सगळीकडे वाहायला लागते. म्हणून कमीत कमी ओझं पाठीवर असावे. यासाठी प्रत्येक कॅम्पवर आम्ही कुमाऊँच्या कॅम्पमध्ये राहिलो व तिथल्याच स्लिपींग बॅग वापरल्या. तिथले जेवण आपल्यासारखेच असायचे.
बागेश्वरपासून सोंगपर्यंत आम्ही बसने गेलो होतो. सोंगपासून खरा ट्रेक सुरु झाला.सोंगवरून आम्ही पहिल्या दिवशी ५ कि. मी. चाललो. जेवण, आख्खी संध्याकाळ व रात्र आम्ही इथेच काढली. या दिवशी आम्ही सर्वांनी पूर्ण धमाल केली. रात्री कॅम्पफायर केली. दुस-या दिवशी धाकूडीला जेवायला थांबून आम्ही खातीला गेलो. (या भागात अशीच विचित्र नावं असतात) धाकूही कॅम्पवरून नंदा कोटचे शिखर दिसते. खाती कॅम्पवरून आम्ही व्दालीमार्गे रात्री फुर्कियाला थांबलो. चौथ्या दिवशी आम्ही पिंडारी ग्लेशियरला गेलो. हा जाऊन- येऊन १४ कि. मी. चा ट्रेक आहे. पण बर्फाळलेल्या वातावरणामुळे आम्ही “झीरो पॉईंटपर्यंत” जाऊ शकलो नाही. ग्लेशियरच्या सुरुवातीलाच थांबावे लागले. पिंडारीचे खरे सौंदर्य आम्हाला दिसू शकले नाही. तरीसुध्दा इथे खुप मजा आली. जेवायला फुर्कियाला परत येऊन पुढे व्दालीपर्यंत गेलो. काफनीचा ट्रेक सर्वात लांब व कठीण होता. २६ कि.मी. आम्हाला जाऊन- येऊन चालावे लागले. हे आम्ही ११ तासात संपवले. मग त्यानंतर परत आलो. व्दाली व बागेश्वर बेस कॅम्प सोडून एकही कॅम्प रिपीट झाला नाही.
आमचा ३० जणांचा ग्रुप पुण्याहून झेलम एक्सप्रेसनी २० तारखेला निघाला. त्यानंतर
वरच्याप्रमाणे आमचे हिंडणे झाले. रोजचे साधारण १५ किलोमिटर चालूनसुध्दा आम्ही कोणी थकलो नाही. फक्त काफनीला जायच्या दिवशी २६ कि. मी. ११ तासात (फक्त!) पार केले. काफनीवर होणारी “Avalanche” आमच्या ग्रुपला प्रत्यक्ष बघायला मिळाली. आम्ही सगळे दूरुन बघत होतो. माझ्यासह खुपजणांनी फोटोही घेतले. टिंगल- टवाळी तर रोजच चालायच्या. पिंडारीवर जेव्हा आमच्या ग्रुप लिडर सरांनी सगळ्यांच्या शर्टात बर्फ टाकला तेव्हा पुढच्या दिवशी काफनी ग्लेशियरवर सर्वांनी त्यांच्यावर बर्फाचे गोळे फेकले. दोन- दोन, तीन- तीनच्या ग्रुपमध्ये चालत - चालत, गप्पा मारत वेळ कसा जायचा हेच समजायचे नाही. आठ कि. मी. चढ मी एकबरोबर गप्पा मारत साडे तीन तासात संपवला. एकटा गेलो असतो तर? ते सुध्दा दाट झाडीमधून खुप डास- माश्या तर होत्याच, “ओनीडा” (सरडे) सुध्दा होते. एकदातर एक ५/६ सरड्यांचा घोळका बघितला, पण फोटो काढायच्या आधीच ते पळून गेले. शेवटच्या दिवशी सगळ्यांना “इतक्या लवकर ट्रेक संपला?” असे वाटायला लागले. पुण्याहून जातांना आम्ही ट्रेनमध्ये मजा केली, गाणी, भेंड्या इ. खेळलो.
अशा रितीने आमचा १६ दिवसांचा ट्रेक संपला. कोणाला ट्रेकिंगला जाण्याची इच्छा असेल अथवा ‘युवाशक्ती’ ची शाखा नाशिकमध्ये उघडायची असेल तर युवाशक्ती (पुणे) यांची मदत होऊ शकेल.
त्यांचा पत्ता- युवाशक्ती,
३८८, नारायण पेठ,
राष्ट्रभाषा भवन, पुणे-३०,
(४११०३०), दूरध्वनी- ४५६६९६
असा आहे.
युवाशक्तीच्या औरंगाबाद व मुंबई येथेही शाखाआहेत.
हृषीकेश मेहंदळे,
राजगृह, विभागीय
आयुक्त निवास,
गोल्फक्लब रोड, नाशिक.
मंगलवार, 28 अक्टूबर 2014
सदस्यता लें
संदेश (Atom)