मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

सोमवार, 17 दिसंबर 2007

चंद्रसेनेचा राज्याभिषेक --पूर्ण

चंद्रसेनेचा राज्याभिषेक


खूप जुनी गोष्ट आहे ही.  पुष्पद्वीप नांवाचा मोठा देश होता.  त्याचा राजा होता अनंतकुमार.  त्याला एकच मुलगी होती.  तिच नांव चंद्रसेना.

चंद्रसेना हुषार होती, खेळकर होती, गुणाची होती.  घोडेस्वारी आणि भालाफेकीत तरबेज होती.  पण तिला एक खोड होती.  गणिताचा अभ्यास तिला अजिबात आवडत नसे.  गणित शिकवणारे शिक्षक आले की, तिच्या सबबी सुरु झाल्याच.  कधी तिला झोप येत असायची, तर कधी तिचा लाडका घोडा शेरु आजारी असायचा.  खुद्द महाराणी पुष्पावती यांनी तिला गणित शिकवण्याचा प्रयत्न केला| पण चंद्रसेनेच्या सबबी वाढतच गेल्या.

महाराज अनंतकुमार चिंतित झाले आणि क्रोधित झाले.  चंद्रसेना त्यांची एकुलती एक मुलगी होती, त्यांच्यानंतर राज्य सिंहासनावर तीच बसणार होतीराज्यकारभार करणार होती. पण अनंतकुमारांची पक्की धारणा होती की, ज्याला गणित येणार नाही.  त्याला राज्यकारभार कांय येणारगणित नीट शिकल्याशिवाय ही राज्य करायला लागली तर राज्य बिघडून ठेवीलशेवटी राजाने घोषणा करुन टाकलीजर चंद्रसेना नीटपणे गणित नाही शिकली तर तिला राज्य मिळणार नाही.

राजाचा जुना मंत्री सुमंत वृध्द आणि अनुभवी होता.  त्यांना या घोषणेने खूप वाईट वाटले.  त्यांनीच चंद्रसेना लहान असल्यापासून तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती  -  कधी कधी स्वत:च तिला राजनीतीचे धडे दिले होते.  आता वृध्द झाल्याने राज्यकारभारात फारस लक्ष देऊ शकत नव्हते तरी कांयया नव्या समस्येवर कांही तरी उपाय त्यांनीच शोधला पाहिजे.

राजाचा एक विदूषक मित्रा होतागंगाराम.  तो विदूषक असला तरी खूप हुषार होता.  सुमंत आणि गंगारामने चर्चा केली.  चंद्रसेनेने गणित विषय नीट शिकलाच पाहिजे.  पण तिला शिकविण्यासाठी कांहीतरी नवीन पध्दत वापरावी लागेल.  खूप विचार करुन दोघांनी एक युक्ती ठरवली.

एक दिवस महाराजा आणि महाराणी काही दरबारी बरोबर घेऊन जंगलात शिकारीला गेले.  दोन-तीन दिवसांनी बातमी आली की, जंगलातून ते सगळेच कुठेतरी हरवले आहेत.  त्यांचा कांही ठावठिकाणा सापडेना.  संपूर्ण पुण्यद्वीपावर शोककळा पसरली.  सुमंत येऊन तातडीने चंद्रेसेनेला भेटले आणि तिला राज्य सांभाळण्याची विनंती केली आणि तिला सल्ला देऊन आपल्या गुप्तहेरांना देशोदेशी जाऊन महाराजांचा शोध घेण्याची आज्ञा केली.  जाणो, एखाद्या शेजारच्या राजाने त्यांना बंदी बनवले असले तर?

कांही दिवसांनी गुप्तहेर प्रमुख हजर झाले.  त्यांना आणि हेरांना महाराजांचा पत्ता लागला नव्हता.  पण त्यांनी बातमी आणली होती की, शेजारचे दोन राजे आक्रमणाची तयारी करत आहेत.  आक्रमणाचा दिवसही ठरला आहे.  ज्या दिवशी सूर्यास्त समयी पूर्वेला चंद्राची बारीक कोर उगवेल, त्याच रात्री आक्रमण होईल.

चंद्रसेना, सुमंत आणि सेनापती यांनी मिळून विचार केला.  सेनापती म्हणालाते दोन देश मिळून आक्रमणाचा बेत ठरवतायत. त्यांची एकूण सेना आपल्यापेक्षा मोठी आहे.  म्हणून आपण आक्रमण करुन चालणार नाही.  त्यांच्या आक्रमणाची वाट पहात आपण बचावाची लढाई लढावी लागेल.  पण सुदैवाने आता आपल्याला लढाईचा दिवस कळला आहे त्याप्रमाणे आपण तयारी करु या.

तेवढयांत पंचांग घेऊन राज ज्योतिषी आला.  तो म्हणाला - कांहीतरी चुकलय.  सूर्यास्त समयी चंद्राची बारीक कोर पश्चिमेला उगवते - पूर्वेला कशी उगवेलगुप्तहेरांची बातमी तपासा.

आता कुठे चंद्रसेनेला समजल की, देशाचा बचाव करण एवढ सोप नाही.  तिने गुप्तहेरांना आज्ञा केली.  पुन्हा जा आणि बातमी तपासून आणा.

गुप्तहेर पुन्हा धावले.  यावेळी नीट तपासून पुन्हा बातमी आणली.  पहिली बातमी बरोबर होती.  सूर्यास्त समयी चंद्राची कोर पूर्वेला उगवेल.  त्याच रात्री आक्रमण होणार.

आता चंद्रसेना विचारात पडली.  ही बातमी म्हणजे एक कोडच झाल होत, आणि ते कोड तिलाच सोडवण भाग होत.  देश वाचवायचा असेल तर हे कोड सोडवायला हव.

मग ती स्वत:च पंचांग घेऊन बसली.  सूर्यास्ताला चंद्र कुठे उगवतो ? कुठेही उगवतो.  तो केवढा असतो ? कसाही असतोकधी बारीक कोर, कधी अर्धगोल तर कधी पूर्ण मोठा चंद्र. पण अंहं! त्यांत गणित असत.

अमावस्येला चंद्र सूर्याबरोबरच उगवतो आणि सूर्याबरोबरच मावळतो. म्हणून तो आपल्याला दिसत नाही.  मग शुक्ल पक्ष सुरु होतो.  चंद्र सूर्या पेक्षा थोडा मागे पडतो.  पण म्हणूनच तो आकाशात सूर्या पेक्षा तासभर जास्त रहातो.  ( खरं तर फक्त 48 मिनिटच ) त्याची बारीक कोर पश्चिमेला दिसते.  दुस-या दिवशी तो आणखीन मागे पडतोत्यामुळे त्याची कोर थोडी मोठी दिसतेत्याची उगवण्याची जागा पश्चिम क्षितिजापासून दिवसागणिक 12 अंशांनी पूर्वेकडे सरकते.  असा सरकत सरकत आणि मोठा मोठा होत तो ज्या दिवशी पूर्व क्षितिजावर उगवतो.  त्यावेळी समोर सूर्य मावळत असतोआणि ती पौर्णिमा असते  -  म्हणजेच सूर्यास्त समयी पूर्वेला उगवणारा चंद्र पूर्ण गोल गरगरीत असतो  -  त्याची बारीक चंद्रकोर कशी असेल?

मग चंद्रसेनेने कृष्ण पक्षाच गणित करुन पाहिल.  पूर्वेकडे चंद्राची कोर कधी उगवते? कृष्ण पक्षांत ! या पंधरा दिवसांत चंद्र जसजसा लहान होत जातो तशी त्याची  उगवण्याची वेळही रात्री उशीरा उशीरा येते आणि जेंव्हा तो अगदी बारीक कोर होऊन उगवतो तेंव्हा सूर्योदय जवळ आलेला असतोसूर्यास्त नाही.

म्हणून चंद्रसेनेने पुन: एकदा गुप्तहेरांना पाठवल.  त्यांनी पुन: तीच बातमी आणली.  इकडे सेनापती सांगू लागले - आपल्याला बचावाची लढाई लढायची आहे.  त्यासाठी निश्चित दिवस कळला पाहिजे.  आपण सैन्याला खूप दिवस नुसत तयारीत बसून रहायला सांगू शकणार नाही.

दिवसामागून दिवस जात होते.   चंद्रसेनेची काळजी वाढत होती.  शेजारच्या दोन्ही राज्यांचे सैन्यबळ वाढत चालले असल्याच्या बातम्या येत होत्या.  चंद्रसेना एकीकडे राज्यकारभार बघतच होती पण दुसरीकडे ती मन लावून गणित शिकून घेऊ लागली.  शिवाय तिने पंचांग, नक्षत्र, चांदण्या, खगोलशास्त्र याचाही अभ्यास चालू केला.

एकदा असाच विचार करीत बसली होती.  कदाचित शेजारच्या राजाने पावसाळयांतला एखादा दिवस ठरवला असेल.  तो पौर्णिमेचाच दिवस असेल पण पूर्वेकडे उगवणा-या चंद्राला ढगांनी झाकून टाकले तर फक्त कोरच दिसेल.

पण छट्. पावसाळयातले ढग कांय त्या राजाला विचारुन चंद्राला झाकतील कांय? छे, छे, हा असा दिवसच असला पाहिजे की ज्याच गणित आधीपासूनच ठरलेल आहे.

आणि पटकन तिला सुचलअसा आधीपासून निश्चित ठरलूला पण नेहमी येणारा दिवस म्हणजे चंद्रग्रहणाचा दिवस.  त्या दिवशी पौर्णिमा असते.  चंद्र सूर्यास्ताच्या वेळी पूर्वेला उगवतो. त्यावेळी ग्रहण लागलेले असेल तर पूर्वेकडून पूर्ण चंद्रबिंब उगवण्याऐवजी फक्त चंद्राची कोर उगवेल.  आणि ग्रहणाच गणित राज ज्योतिषांना येत.  ते सांगू शकतात की सूर्यास्ताच्या वेळीच चंद्रग्रहण लागलेल असेल असा ग्रहणाचा दिवस कोणता?

मग चंद्रसेनेने दरबार भरवला.  राज ज्योतिषांनी तिला तो नेमका दिवस सांगितला होताच.  त्याप्रमाणे सेनेची तयारी करण्याचे आदेश चंद्रसेनेने दिले.  सर्वांनी तिच्या बुध्दिमत्तेचे कौतुक केले.  सगळे म्हणू लागलेहिच्यामुळेच राज्याचा बचाव होऊ शकेल.  नाही तर शत्रूंनी राज्य जिंकून घेतले असते.

सुमंत पण खूष झाले.  त्यांनी गणिताचे अजून चांगले शिक्षण आणले.  चंद्रसेनेचा गणिताचा अभ्यास जोमाने चालू लागला.

पुढल्या पौर्णिमेला दरबार भरलेला होता.  सुमंत म्हणालेराजकुमारी, आज पौर्णिमा आहे.  पण ही ग्रहणाची पौर्णिमा नाही.  आज सायंकाळी पूर्ण चंद्र निघेल. त्याच वेळी महाराज अनंतकुमार, महाराणी पुष्पावती आणि आपल्या ज्या शेजारच्या देशांत ते पाहुणचार घेत होते ते महाराज पर्वतकुमार, असे सर्व येतीलमग महाराज स्वत: आपला राज्याभिषेक करतील.

आणि ते सैन्याचे आक्रमण? दोन देशांच सैन्य एकत्र आल्याची बातमी? ते सगळ कांय होत? चंद्रसेनेने आश्चर्याने विचारले.  पण सुमंतांच्या मिशीतल्या मिशीत हसण्याने तिला सगळ कांही समजल.

सायंकाळी थाटामाटात चंद्रसेनेचा राज्याभिषेक झाला.  प्रजेने तिला दाद देत म्हटलेपहा आमची राजकुमारी गणितात कशी तरबेज आहे!

                 *********







कोई टिप्पणी नहीं: