एका गांवी जीवराज नावाचा एक कुंभार रहात होता. तो फार विसराळू होता. त्याच्या विसराळूपणामुळे सर्वांना त्रास होत असे. त्याला स्वत:ला तर फारच त्रास होत असे.
एकदा जीवराज आजारी पडला अणि डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांना त्याचा विसराळू स्वभाव माहीत होता. म्हणूनच त्याला खूप औषध लिहून देण्याऐवजी डॉक्टरांनी त्याला तिथेच कांही औषध प्यायला दिल आणि बजावल
- आता इतर कांही नाही. फक्त घरी जाऊन खिचडी खा आणि झोप. लक्षांत ठेव,
इतर कांही बाही खाऊ नकोस.
जीवराज म्हणाला - पण डॉक्टर,
मला खिचडी खायची आहे हे मला कस लक्षात रहाणार
?
डॉक्टर म्हणाले - अस कर,
तू घरी जाईपर्यंत खिचडी-खिचडी अस घोकत जा आणि घरी गेल्यावर लग्गेच खिचडी कर आणि खाऊन टाक.
त्याप्रमाणे जीवराज खिचडी-खिचडी अस घोकत निघाला. तो थोडा उंच आवाजातच खिचडीचा जाप करत होता - म्हणजेच विसर पडू नये. रस्त्यांत एक छोटासा ओढा होता व त्यांत चिखल साचला होता. त्यात पाय टाकायचा म्हणजे धोतर भिजणार. म्हणून जीवराजने ओढयापर्यंत धावत येऊन उडी मारुन ओढा ओलांडला.
पण उडी मारण्याच्या नादांत तो खिचडी शब्द विसरला आणि त्याऐवजी खाचिडी-खाचिडी अस म्हणून लागला. त्याला कळलच नाही की आपल कांही चुकतय्.
थोड अंतर चालून गेल्यावर त्याला बाजरीच एक शेत लागल. बाजरीची कणसं भरगच्च भरली होती आणि पिकू लागली होती. दाणे खाण्यासाठी पाखरांचे थवे येत. मग राखणदार शेतकरी गोफणीने दगड भिरकावून शिवाय हा-हा करुन त्यांना उडवून लावण्यांत थकून चालला होता.
त्याच्या समोरुन जीवराज मोठया आवाजात खाचिडी-खाचिडी म्हणत निघाला तसा शेतक-याला रागच आला. त्याने ओरडून जीवराजला आपल्याजवळ बोलावेल. मग म्हणाला
- कांय रे,
कोण आहेस तू? मी इतकी मेहनत घेऊन हे शेत नांगरल,
पेरणी केली, बाजरी उगवली आणि भरु लागली तशी राखण करण्यांत किती श्रम होतात - तेही करतो. आणि तू खुशाल चिमण्यांना खा चिडी, खा चिडी म्हणून निमंत्रण देतोस? माझ्या बाजरीचे दाणे खायला सांगतोस?
जीवराज म्हणाला - बरं बाबा,
नाही खाचिडी. तूच सांग कांय म्हणू. शेतकरी म्हणाला,
तू उड चिडी,
उड चिडी अस म्हण. कोण जाणे तुझ्या सांगण्यावरुन चिमण्या उडून दुसरीकडे जातील.
म्हणून मग जीवराज उड चिडी,
उड चिडी म्हणत रस्ता चालू लागला.
थोड अजून पुढे गेल्यावर त्याला एक छोट जंगल लागल. तिथे एक पारधी बसून होता. त्याने समोर पाखरांना पकडण्यासाठी जाळ लावल होत,
दाणे पण टाकले होते. पण सकाळपासून एकही पक्षी अडकलेला नव्हता. तो वाट पहात होता. कांही पक्षी जाळयांत अडकतील. मग मी त्यांना बाजारांत नेऊन विकेन,
मग थोडे पैसे मिळतील. त्यातून भाजी-भाकरी विकत घेऊन खाईन. पण पक्षी येतच नव्हते.
पारध्याने पाहिले, जीवराज जोरजोराने उड चिडी, उड चिडी म्हणत चालला होता. पारध्याला राग आला. त्याने हाका मारुन जीवराजला बोलावले - कांय रे,
कोण आहेस तू
? मी इथे सकाळपासून जाळ लावून बसलो आहे. पाखरं येऊन अडकतील अशी वाट पहातो आहे. मग मी त्यांना बाजारांत नेऊन विकेन,
मग पैसे मिळतील. मग मी भाजी-भाकरी विकत घेऊन खाईन. तू कुठून तरी येतोस आणि चिमण्यांना खुशाल म्हणतोस उड चिडी
?
जीवराज म्हणाला - बरं बाबा,
रागावू नकोस. नाही म्हणत उड चिडी. तूच सांग कांय म्हणू?
पारधी म्हणाला - पण तुला कांहीही म्हणायची गरजच कांय
? आपण कांय रस्त्यावर चालतांना कांही तरी म्हणत चालतो होय?
जीवराज बोलला - बरोबर आहे रे. पण मी मात्र मगापासून कांही तरी म्हणतच चाललो होतो. कांय बरं?
हां, आठवल - मी म्हणत होतो
- खाचिडी. मग एका शेतक-याने मला थांबवल आणि उड चिडी म्हण अस सुचवल.
पारधी म्हणाला - पण तू खाचिडी तरी का म्हणत होतास?
जीवरात बोलला - कारण त्यांनी मला सांगितल होत - घोकत घोकत जा म्हणजे विसरणार नाही.
पारधी वैतागला - किती रे कोडयांत बोलतोस तू ? कुणी सांगितल घोकत घोकत जा. जीवराज उत्तरला
- डॉक्टरांनी! हां,
आठवल. मला ताप आला म्हणून मी डॉक्टरकडे गेलो होतो. त्यांनी मला औषध पाजल आणि घरी जाऊन कांही तरी खायला सांगितल. पण नेमक कांय खायला सांगितल तेच मला आता आठवत नाही.
पारधी हसून म्हणाला. हात् तेरे की,
अरे डॉक्टरनी तुला खिचडी खायला सांगितल असणार.
जीवराज आनंदला. तो म्हणाला
- होय, बरोबर! खिचडीच खायला सांगितल होत.
पारधी उदास होत म्हणाला
- खरं तर मला पण खिचडी खायला आवडते. पण आज तर माझ्या जाळयांत एकही पक्षी अडकला नाही. मग मला पैसे कसे मिळणार. मला आज साधी भाकर खायची मारामार. मग मी खिचडी कशी खाणार?
जीवराज म्हणाला - मित्रा, असा उदास नको होऊस. तू किती चांगल्या त-हेने मला विसरलेली आठवण करुन दिलीस. आता माझ्या बरोबर तू पण माझ्या घरी चल. आपण दोघे खिचडी खाऊ. मला विसर पडला तरी तुझ्या लक्षात राहील.
मग जीवराज आणि पारधी दोघेही जीवराजच्या घरी गेले आणि आरामात बसून खिचडी खाल्ली.
********
----------------------------------------
Marathi published in Nashik Sakal 1996Hindi published in devputra, Indore, dec 2006
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें