मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

मंगलवार, 13 जनवरी 2009

कशी होती फड पद्घत -03

लीना मेहेंदळे
leenameh@yahoo.com
kept on son_denare_pakshi
Published in Lokmat , saturday, 17 Jan 2009
भूगोलाच्या धड्यांत आपण नद्यांबद्दल वाचतो. नदीवर धरणं आणि बंधारे बांधून शेतीला पाणी पुरवले जाते. आताच्या युगांत मोठी धरणं बांधली जातात आणि त्यावरून वादही होतात. त्याला छोट्या छोट्या साखळी धरणांचा चांगला पर्याय आहे. अशाच सुमारे चाळीस धरणांची एक साखळी फार पूवी पांझरा नदीवर होती.
सह्याद्रीच्या डोंगरात पांझरा नदी पश्चिमेला उगम पावते आणि पूर्वेकडील उतारावरून खाली येत साठेक गांव ओलांडून धुळे शहरापर्यंत येते. मग शहराला वळसा घालून ती पूर्णपणे पश्चिमेकडे वळते. तिचा संगम तापी बरोबर होतो. बस, इथे पांझरा नदी संपते.
पण सह्याद्रीच्या उंच कडे-कपारीतून धुळे शहरात उतरेपर्यंत मधे जी गांवं लागतात, त्या सर्व गावांनी पेशवे काळात - म्हणजे सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी - नदीवर छोट्या धरणांची एक साखळी बांधली होती. छोटी म्हणजे किती छोटी ? तर जमिनीपासून फक्त पाच फूट उंच बांधातून एक कालवा गावच्या शेतांना पाणी घेऊन जायचा तर दुसरा कालवा बांधाच्या भिंतीला वळसा घालून पुन: नदीत उतरायचा. त्यामुळे नदीला पूर आला तरी पाणी बांधाच्या डोक्यावरून वहात नसे. ते आधीच गावातल्या शेतात किंवा दुस-या रस्त्याने नदीत आलेले असायचे. त्यामुळे बांध सुरक्षित रहायचे.
गावात जाणा-या पाण्यामुळे जी शेती भिजायची त्याचे तीन भाग केले जायचे. त्या-त्या भागातल्या शेतक-यांवर दंडक होता की त्यांनी एका वर्षी ऊस (किंवा केळी), लावली तर दुस-या वर्षी गहू आणि तिस-या वर्षी ज्वारी लावलीच पाहिजे. त्यामुळे तीन वर्षांचा हिशोब पाहिला तर सर्वांना पाणी वाटप समानपणे होऊन त्याचा फायदा प्रत्येकाला सारख्या त-हेने मिळत असे. पिकाला आपोआप फेरा मिळाल्यामुळे जमीनीची प्रत टिकून रहात असे. व्यापा-यांना त्या त्या गावांतून निश्चित किती माल विकत घ्यायचा आहे त्याचा अंदाज येत असे. शिवाय गांव शेतीला एका दिवशी जास्तीत जास्त किती पाणी मिळू शकते? तर कालव्याची पाणी नेण्याची क्षमता असेल तितकेच. म्हणजेच कुणी जास्त पाणी चोरण्याची शक्यताच संपली. नदीला जितके जास्त पाणी येईल ते सर्व खालच्या गावांना व धुळयापर्यंत जात असे.
या सगळया गावांचे गांवकरी मिळून वर्षातून एकदा नदीच्या उगमापासून तर धुळयापर्यंत तपासणी करीत असत. हेतु हा की कुठल्याही गांवाने बंधा-याची उंची वाढवायची नाही किं वा त्यांचा कालवा पण जास्त रूंद करायचा नाही - कारण असे केले तर खालच्या गावांचे पाणी कमी होईल.
शिवाय सर्व गांवकरी मिळून उगमापासून ठिकठिकाणी झाड लावत - म्हणजे पावसाचे पाणी वेगाने निघून जाण्याऐवजी झाडांमुळे अडले जायचे आणि हळू हळू झिरपत नदीत टिकून रहायचे आणि गावांना पिण्याच्या पाण्याची सोय वर्षभर कायम रहायची.
तुम्ही कधीही नदीवर फिरायला जाल तेव्हा विचार करा - असे छोटे बंधारे आपले आपणच बांधता येतील कां ? किती सोप आहे हे तंत्र शिकून घेणं ! आणि हो, नदीशी बोलायचा प्रयत्न करा. मग पहाच मजा. हळू हळू तुम्हाला कळेल की नदी पण आपल्याशी बोलू शकते.
आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात बारमाही धबधबे फार कमी आहेत - जवळजवळ नाहीच. पण हिमाचल, उत्तरांचल, आसाम वगैरे प्रांतात बारमाही छोटे धबधबे आहेत तिथे फार पूर्वी पासून पाणचक्क्या आहेत. पाण्यामुळे भलंमोठं एक लाकडी जातं फिरायचं आणि त्यावर लोकांना गहू, ज्वारी वगैरे धान्य दळून दिलं जायचं. महाराष्ट्रात अशी एकमेव पाणचक्की औरंगाबाद शहरात होती. आता जागोजागी विजेवर चालणा-या गिरण्या सुरु झाल्यामुळे पाणचक्क्यांचा विचार आपण करत नाही. पण हिमाचल, उत्तरांचल, आसाम वगैरे प्रांतांत त्यांचे महत्व अजूनही आहे. आता तर ते जास्त वाढू शकते. आता लाकडी जात्याऐवजी पोलादी जाती, गियर्स इत्यादींच्या सहाय्याने या पाणचक्क्यांमधून चक्क छोटया प्रमाणावर वीज निर्मिती केली जाऊ शकते. त्याने त्या त्या गावांपुरता तरी वीज पुरवठा करता येतो. अशा कित्येक नव्या गोष्टींची आज आपल्या देशाला गरज आहे.
-------------------------------------

कोई टिप्पणी नहीं: