published in Lokmat on 31 jan 2009
लहानपणी आम्ही भेंडयांसारखाच पण थोडा वेगळा एक खेळ खेळत असू. दोन पार्ट्या. त्यांनी एकापाठोपाठ एक धडाधड फुलांची नांव सांगायची. जी पार्टी अं, अं, करेल म्हणजे पटकन नांव सांगू शकणार नाही, त्या पार्टीवर भेंडी. खेळ लवकर संपवायचा नसेल तर नांव आठवण्यासाठी घड्याळ लावून 1 किंवा २ मिनिट वेळ द्यायचा. याच खेळाचा थोडा वेगळा प्रकार असा कि दोन्ही गटांनी एका ठरावित ठेळेत पाटीवर नांवे लिहून काढायची- त्यांत पुनः रंग पण ठरवून दिले जायचे- कधी फक्त लाल फुलं, कधी पांढरी फुलं - कधी वासाची तर कधी बिनवासाची फुलं, वगैरे. या खेळामुळे आमच सृष्टिज्ञान खूपच वाढल आणी सृष्टिप्रेम पण.
असा खूप फुलांचा विचार केला की एक गोष्ट पटकन लक्षात येते. साधारणपणे भारतीय फुलं पांढरी आणी सुवासिक असतात तर रंगीत फुल कमी वासाची. विशेषतः विदेशातून आपल्याकडे आणून लावलेली खूपशी रंगीत फुल बिनवासाची आहेत पण वासाची कमतरता रंगानी भरून काढली आहे - मग एकाच जातीच फूल आपल्याला विविध रंगात पहायला मिळत.
पांढ-या फुलांच आणी पावसाच पण नात असतं. बहुतेक सर्व पांढरी फुल पावसाळ्यांत फुलू लागतात. कारण पण उघड आहे. पाण्यामुळेच सुवास निर्माण होतो. तापलेल्या मातीवर पाऊस पडल्याने जो मातीचा गंध दरवळतो त्याच्या पुढे बाकी सर्व गंध फिक्के पडतात अस मला वाटत.
तरी पण फुलांच्या वासाच महत्व कमी होत नाही. वासाची पांढरी फुलं म्हटल की हटकून पहिल नांव तोंडावर येत ते जाई आणी जुईचं. जुईच फूल लहानखोर - नाजुक, तर जाईच थोडस मोठ. मांडवावर हे वेल चढवून ठेवले तर जवळ जवळ वर्षभर फुलं येत रहातात. त्याही पेक्षा गंमत म्हणजे बागेत झोपाळा बांधायचा, शेजारी हे वेल दोन्ही बाजूला लावायचे आणी झोपाळयाच्या कमानीवरच चढवायचे. किंवा दोन तीन मजली घर असेल, गच्ची असेल, तिथे गच्चीवर वेल चढवायचे. जुईच्याच वासाच आणखीन एक थोड मोठ फूल म्हणजे सायली. कोणी तिला चमेली पण म्हणतात.
ही सगळी फुले पांढरीच! पण शुभ्र पांढर फूल बघायच असेल तर ते म्हणजे कुंदाच फूल. म्हणूनच पांढ-या स्वच्छ दातांना कुंदकळ्यांची उपमा देतात. 'या कुन्देन्दु तुषारहारधवला' सारख्या सरस्वतीच्या श्लोकांत पण धवलपणासाठी कुंदाची उपमा दिली आहे. पण कुंदाचा वास अगदी मंद, जवळून घेतला तरच येतो.
पांच पाकळयांचं चादणीच्या आकाराच एक फूल असतं, - बहुतेक मंदिरांमधे देवाचे हार करण्यासाठी वापरतात. लहानपणापासून माझ्या मनांत चांदणीच्या फुलाच्या मंद वासाच आणी मंदिराच गणित इतक पक्क जमलय की त्या फुलाच्या वासाबरोबरच मला जबलपूरच्या माझ्या शाळेच्या वाटेवरचं कृष्णाचं मंदिर डोळ्यासमोर दिसू लागत.
वासाने घर भरून टाकणार फूल म्हणजे मोगरा. हा पुन्हा कधी एकेरी असेल, तर कधी खूप गच्च पाकळयांचा. मोग-याच्या एका जातीच नाव तर हजारी मोगरा आहे- कारण तो गुच्छा-गुच्छांनी फुलतो.
पांढ-या फुलांवर वेगवेगळया रंगांच्या छटा- आल्या की त्यांचे रंग वेगवेगळे वाटतात. प्रत्येक छटेच आकर्षण वेगळच. पारिजातकाच्या फुलाला केशरी देठ असतं. अत्यंत मधुर वासाच हे फूल भल्या पहाटे दरवळायला सुरवात होते ते सूर्योदयापर्यंत. ज्यांना पहाटे उठता येत नसेल त्यांना यांचा सुगंध कधीच कळणार नाही. आमच्या घरांत शेजारी शेजारीच रातराणी आणी पारिजातकाची झाडं आहेत. रातराणी दरवळण्याची वेळ रात्री आठपासून दोन-तीन पर्यंत - पहाट झाली की मात्र पारिजातकाचं राज्य सुरू होतं.
बुचाचे फूलही असेच, सुंदर, लांबपर्यंत वास दरवळणारे. याला लांब देठ असल्याने बिन दो-यानेच छान गजरा करता येतो. किंवा उथळ बशीत पाणी ठेऊन त्यांत ही फुलं गोलाकार सजवून ठेवली तर दोन दोन दिवस छान वास देत रहातात. याचे झाड खूपखूप उंच असते. आपण फक्त खाली पडलेली फुलेच वेचू शकतो. याची इतर नांवं आहेत – गगनजाई (मराठी), गगनमल्लिका (कन्नड) आकाशनील (हिंदी, बंगाली).
सहा-सात पाकळ्यांचं टपोरं अनंताच फूल कोकणांत खूपच प्रिय. वास तर इतका छान की याला हिंदीत गंधराज आणी ओरिया-बंगालीत सुगंधराजच म्हणतात.
छोट्या बटणाच्या आकाराचं बकुळीचं फूल—याचा छान सडा दिवसभर पडत असतो. लांबपर्यंत याचा मंद सुगंध जातो. आम्ही ही पुलं पुस्तकांत ठेऊन देत असू कारण सुकली तरी या पुलांचा वास कित्येक वर्ष टिकून रहातो.
खूप जणांना लक्षांत येत नाही, पण चैत्रातील पहाटेच्या मंद झुळुकी बरोबर कडुलिंबाच्या फुलांचा वास दरवळतो तो अप्रतिमच. असाच आंब्याच्या मोहोराचा वास, आणी हो, बाभळीचीही एक अशी जात असते जिला छान वासाची बारीक पांढरी फुले येतात.
या यादीत अजूनही कितीतरी फुलांची नांवं राहिली आहेत, उदा. चाफा, कमळ, वगैरे. पाहू या तर, तुमच्या पैकी कोणकोण मला फुलांची माहिती कळवू शकेल.
--------------------------------------------------------
1 टिप्पणी:
सुरेख . ही सर्व फुले मला धुंदावतात
एक टिप्पणी भेजें