मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

शनिवार, 7 फ़रवरी 2009

चला बनवा आपापल्या माहितीचा ढग -06

संगणक म्हणजे सुपर संदेशवाहक.संगणक म्हणजे माहीतीचा खजिना
published in Lokmat on 7 Feb 2009
संगणकावर इंटरनेटव्दारे जगभर फाईली पाठविण्याचा शोध १९९५ मध्ये लागला. त्याच्या खूप आधी म्हणजे 1885 च्या आसपास जगदीशचंद्र बोस व मार्कोनी या वैज्ञानिकांनी रेडियो तरंगांच्या सहाय्याने एका जागेवरुन दुसरीकडे आवाज किंवा संदेश पोचवण्याचं तंत्र शोधल होतं. त्यातूनच पुढे रेडियोचा जन्म झाला. रेडियोसाठी प्रसारण करणा-या आकाशवाणी केंद्रांवरुन तिथले कार्यक्रम रेडियो तरंगाच्या सहाय्याने अवकाशात पाठवतात. त्याचवेळी आपण आपला ट्रान्झिन्टर ट्यून केला असेल तर तो या रेडियो तरंगांना पकडतो, आणि मूळ केंद्रावर चालणारा कार्यक्रम आपल्याला जसाच्या तसा ऐकवतो. पण तो क्षण निघून गेल्यावर आपण तो कार्यक्रम ऐकू शकत नाही. म्हणूनच आकाशवाणी केंद्रावर सहा वाजता लागणारा कार्यक्रम आपण सात वाजता ऐकू शकत नाही. याला रियल टाइम किंवा ऑन-लाईन अप्रोच म्हणजे “ज्या च्या त्या क्षणाला” असे नांव आहे. (हुषार लोकांनी त्यावर तोडगा काढलाच- की सहा वाजता लागलेला कार्यक्रम कुणाला तरी रेकॉर्ड करुन ठेवायला सांगायचे आणि मग तो सावकाश ऐकायचा.)
तसेच या पध्दतीला “ब्रॉडकास्ट पध्दत” असे नांव आहे. कारण केंद्रावरील ट्रान्समिशन ताबडतोब दाहीदिशात पसरते आणि कुणीही ते ऐकू शकतो. सर्वांसाठी खुले!
पण त्याही खूप आधी म्हणजे 1876 मधे अलेक्झांडर ग्राहम बेल (Alexander Graham Bell) ने टेलिफोनचा शोध लावला. त्यामध्ये एका यंत्रावर बोललेले स्वर लगेच इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये बदलतात, आणि टेलिफोनच्या तारेतून दुस-या टोकाला किंवा लांबच्या गावांला पोचतात. तिथल्या रिसीव्हर मध्ये ते पुनः स्वरांच्या रुपाने तिकडच्या माणसाला ऐकू येतात. हे देखील ऑन-लाईनच असते.
यात महत्वाचा मुद्दा असा की फोनवरील संदेश-वहन एका विशिष्ट फोन नंबर वरुन दुस-या विशिष्ट फोन नंबरवरच जाऊ शकते - ते सर्वाना खुले नसते. त्यांना पाठवणा-याचा पत्ता (महणजे फोन नंबर) आणि ज्याला पाठवावयाचे त्याचा पण फोन नंबर सांगावा लागतो. याला point to point संदेशवहन म्हणतात.
फोनचे संदेशवहन जगभर जाणे गरजेचे असल्याने गेल्या शंभर सव्वाशे वर्षांत समुद्रातून, जमीनीखालून, जमीनीवरुन असे तारांचे जाळेच जगभर विणले गेले. त्यासाठी अल्युमिनियमच्या तारा, तांब्याच्या तारा यासोबत काचेच्या तारा - ऑप्टिक फायबरचा वापर करण्यात आला. ऑप्टिक फायबरची क्षमता इतर तारांपैकी कितीतरी पट अधिक असते. असे तारांचे जाळे विणणा-या कंपन्या जगांतील अति श्रीमंतांच्या यादीत असतात. संगणकासाठी देखील याच तारा वापरल्या जातात.
यावरुन आपल्या लक्षांत येईल की, सुरुवातीच्या काळापासून संदेश पाठविणा-या दोन त-हा विकसित झाल्या. एका विशिष्ट पत्त्यावरुन दुस-या पत्त्यावर संदेश पाठविणे- जो फक्त त्याच व्यक्तीला घेता येईल अशी एक पद्धत. फार पूर्वीची टपाल खात्याने पत्र पाठविण्याची पध्दत याच प्रकारची होती हे तुमच्या लक्षात आले असेलच. मात्र टपालाला पोचायला वेळ लागतो ही गैरसोय तर येणारे पत्र हे ऑफ-लाइन म्हणजे ज्याला मिळाले त्याने त्याच्या सोयीने कितीही उशीर करुन वाचावे असे असते, ही मोठी सोय.
दुसरी त-हा म्हणजे ब्रॉडकास्ट मेथडने एकाचवेळी कोण्या एका संपूर्ण क्षेत्रात ऐकता येईल अशा पद्धतीने ब्रॉडकास्ट करणे. रेडियो किंवा दूरदर्शनवरुन येणारे संदेश ब्रॉडकास्ट पद्धतीचे म्हणजे कुणीही ऐकावे असे असतात पण ऑन लाइन म्हणजे ज्या क्षणी ते पोहोचतात त्याच क्षणी ऐकावे लागतात.
संगणकात या दोन्ही सोयीचा मेळ घातलेला आहे. जाणारी ई-मेल टेलिफोनच्या तारांमधून जात असल्याने ट्रॅफिक जाम नसेल तर लगेच पोहोचते. ती point to point पध्दतीची असते, म्हणजे ज्याच्या पत्त्यावर ई-मेल पाठविली त्यालाच ती मिळते, मात्र सोयीने केव्हांही वाचता येते.
ई-मेल चा प्रवास बव्हंशी तारेतून, क्वचित थोडे अंतर रेडिओ तरंगाच्या माध्यमातून व कधीकधी सेटेलाइट च्या माध्यमातून होतो. मोबाईल चे संदेशगमन देखील point to point असते. मात्र टेलिव्हजनचे संदेशगमन ब्रॉडकास्ट पध्दतीने असते.
संगणक म्हणजे माहीतीचा खजिना कसा बनतो ते पाहू या. ई-मेल चे संदेश-वहन point to point असले तरी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन गूगल, याहू सारख्या कंपन्यांनी अशी सुविधा निर्माण केली ज्याव्दारे आपण अवकाशांत आपल्या स्व:तचा एक माहितीचा ढग तयार करु शकतो आणि या ढगाचा देखील एक पत्ता असतो. जो हा पत्ता गाठील त्याला तिथे लिहीलेली माहिती वाचता येते किंवा इतरही बरीच कामे करता येतात चित्र, व्हिडियो अशा सर्व प्रकारची माहिती आपल्या ढगावर ठेवता येते. या ढगांमधे सगणकाच्या भाषेत वेब साईट, ब्लॉग साईट किंवा पोर्टल असे प्रकार आहेत. गूगल, याहू यांचे स्वत:चे असे ढग तर आहेत. शिवाय ते इतरांच्या ढगांचे प्रबंधन पण करतात. त्यामुळे त्यांना सर्वांचे सर्व ढग- व त्यातील माहिती पहाता येते. यासाठी त्यांनी स्वत:ची सर्च इंजिन्स तयार केली. म्हणून जर कोणी गूगल सर्च वर भारत हा शब्द टाईप केला तर ज्या ज्या ढगांवर, ज्या ज्या माहीतीत भारत हा शब्द आला असेल त्या सर्व पानांची एक यादीच आपल्या समोर ठेवली जाते. आजच मी गूगल सर्च वर भारत हा शब्द टाइप केल्यावर संगणकाने माहिती दिली की सर्व माहिती ढगांवर मिळून एकूण एक कोटी दोन लाख पानांवर भारत हा शब्द आढळतो व ती यादी शोधून माझ्या समोर ठेवायला गूगलला फक्त 0.21 सेकंद लागले.
यावरुन आपल्याला कळेल की. संगणक उघडून त्यावर इंटरनेट सुरु करुन गूगल सर्च उघडले तर माहितीचं एक अफाट जग आपल्या समोर उघडत. त्यात वृत्तपत्रातील माहितीपण असते. कित्येक लेखक आपले संबंध पुस्तकच्या पुस्तक स्वतःच्या माहिती- ढगांवर टाकून ठेवतात. ते आपण वाचू शकतो. प्रश्न विचारु शकतो. मित्रमंडळ स्थापन करु शकतो.
तर मग चला आणि तयार करा आपापले माहितीचे ढग आणि कळू द्या जगभराला तुमचे विचार.
-- लीना मेहेंदळे, leenameh@yahoo.com
----------------------------------------------------