सुंदर नक्षत्र मृगशिरा (हिंदी -- आओ बच्चों -- अलग से)
Published in Lokmat, dt 14 Feb 2009
संक्रांत संपून वसंत ऋतु आलेला आहे, दिवस मोठा होऊ लागलेला आहे. सूर्यास्ताच्या तासाभरानंतर पूर्वेकडे बघितले तर आकाशात सगळयात सुंदर आणि मोठया तारकांनी भरलेले मृगशिरा नक्षत्र आपण लगेच ओळखू शकतो.
आकाशात कधीही चांदण्या बघताना आपल्याला प्रश्न पडतो, की यांची नांवं काय आहेत? कोण कोण आहेत या चांदण्या? आकाशातील सगळयात मोठया चार चांदण्या शुक्र, गुरु, व्याध व अभिजित या आहेत. सध्या सुर्यास्तानंतर पश्चिमेकडे मोठी शुक्राची चांदणी आणि पूर्वेकडे मोठी व्याधाची चांदणी दिसते. त्यांना ओळखायची खूण म्हणजे त्यांचा मोठा आकार होय.
मृगशिरा नक्षत्राला इंग्रजित ‘ओरायन’ असे म्हणतात. हे नक्षत्र आकाशात विस्तीर्ण पसरलेले आहे. याच्या मध्य भागी एक सारख्या चकाकणार्या तीन चांदण्या असतात. त्या एका सरळ रेषेत असतात म्हणून त्यांना त्रिकांड असे म्हणतात. त्यांच्यामुळेच ग्रामिण भागात या नक्षत्राला ‘तीन काडयांचे नक्षत्र’ असे म्हणतात.
चित्रात दाखविल्याप्रमाणे त्रिकांडाच्या सरळ रेषेतच डाव्या बाजूला (दक्षिणेकडे) व्याधाची मोठी चांदणी असते तर उजव्या बाजूला (उत्तरेकडे) रोहीणी नक्षत्राची लालसर चांदणी असते. व्याध, त्रिकांड आणि रोहिणी या पाच चांदण्या जवळपास एका सरळ रेषेत आहेत. यातील व्याधाची चांदणी खूप मोठी असतेच मात्र रोहिणीचा आकारही त्रिकांडाच्या चांदण्यापेक्षा मोठा आहे.
त्रिकांडाच्या थोडया खालच्या बाजूला त्रिकांडाशी सुमारे 30 अंशाचा कोन करीत, एका सरळ रेषेत अजून तीन चांदण्या दिसतात. मात्र या तीन चांदण्यानी आभा कमी-कमी होत गेलेली दिसते.
त्रिकांडांच्या चारी बाजूला साधारणपणे आयाताकृतीमध्ये आणखी चार चांदण्या आहेत, त्या चारही चांदण्याची आभा त्रिकांडातील चांदण्यापेक्षा जास्त परंतु व्याधाची चांदणीपेक्षा कमी व सुमारे रोहीणीच्या चांदणी इतकी असते. या चार आयाताकृती चांदण्यांमुळे मृगशिरा नक्षत्राला ग्रामीण भागात ‘खाटबाजल’ असे नांवही पडलेले आहे. या संपूर्ण विस्तारामुळेच मृग हे आकाशातलं महत्त्वाचं आणि सुंदर नक्षत्र आहे. इतके की सागरी वाहतूकीसाठी दिशा ओळखण्यासाठी सर्व नाविकांना याचा मोठा आधार आहे.
चित्रात दाखविल्याप्रमाणे मृगशिरातील या 10 चांदण्यांच्या थोडे वर समांतर चतुर्भूज आकृतीत पुनर्वसु नक्षत्राच्या चार चांदण्या दिसतात. त्यातील उजवी कडील खालच्या चांदणीची आभा खूप मंद असते. पण हा सुंदर समानान्तर चतुर्भूज ओळखून काढायला पुरेशी असते. या चार चांदण्या मिळून पुनर्वसु नक्षत्र बनते.
मृगशिरा या शब्दाचा अर्थ हरणाचे डोके. भारतीय पौराणिक कथांमध्ये अशी कथा आहे की, एका दृष्ट राक्षसाने रोहीणी नांवाच्या अप्सरेला त्रास देण्यासाठी हरणाचे रुप घेऊन तिच्यावर चाल केली, त्यावेळी विष्णूने व्याध म्हणजेच शिका-याचे रुप धारण करुन तीक्ष्ण बाण सोडला. तो त्या हरणाच्या पोटात रुतला, हे बाण म्हणजे त्रिकांडाच्या तीन चांदण्या आहेत. म्हणून व्याध, त्रिकांड, आणि रोहीणी एका सरळ रेषेत दिसतात. त्रिकांडाच्या खालच्या बाजूस तीन छोटया चांदण्या म्हणजेच हरिणांच्या शरीरातून ओघळलेले रक्ताचे थेंब. त्रिकांडाच्या सभोवताली जे चार आयताकृतीे तारे आहेत ते म्हणजे हरीणीचे शरीर. आयाताकृतीच्या आत इतरही बर्याच छोटया, छोटया चांदण्या आहेत त्या म्हणजे हरीणाच्या शरीरावरील ठिपके. त्या चित्रात दाखविलेल्या नाहीत.
परंतु ग्रीक पौराणिक कथेमध्ये मृगशिराचे नांव ‘ओरायन’ असे आहे. ग्रीक कथेनुसार ओरायन हा एक जबरदस्त शिकारी होता. तो आपल्या कंबरेला तीन हिरे जडवलेला पट्टा बांधत असे, या पट्टयाच्या खालच्या बाजूला त्याचे खंजीर लटकत असे व त्यावरही तीन हिरे जडलेले असत. ओरायनच्या पट्टयातील तीन चमकणारे हिरे म्हणजेच त्रिकांडाच्या तीन चांदण्या होय.ज्या चांदण्याना आपण व्याध म्हणजेच शिकारी असे म्हणतो त्याचे ग्रीक कथेतील नाव ‘सिरीयस’ असे असून तो ओरायनाचा शिकारी कुत्रा होता. खगोल शास्त्रात याला केनिस मेजर असे म्हणतात. या चांदणी जवळच ‘केनिस मायनर’ या नांवाची छोटी चांदणी पण दिसते जी ग्रीक कथेनुसार ओरायनचा छोटा कुत्रा आहे.
आपल्या पृथ्वीच्या सर्वात जवळ जे तीन तारे आहेत ते क्रमश: सुर्य, अल्फा सॅटॉरी व व्याध हे आहेत. यामुळे भविष्यकाळातील अंतरीक्ष विज्ञानासाठी व्याधाची चांदणी महत्वाची आहे.
येत्या महिन्याभरात सुर्यास्तानंतर थोडया वेळात मृगशिरा नक्षत्र, पूर्व दक्षिण क्षितीजावर दिसू लागेल. या नक्षत्राचा रात्रभराचा प्रवास पूर्वेकडून हळू हळू पुढे जात पहाटेच्या सुमारास पार पश्चिम-दक्षिण क्षितीजावर त्याचा अस्त होतो. रात्री वेगवेगळया वेळी अधून मधुन उठून आकाशाकडे दृष्टी टाकली तर या सुंदर नक्षत्राची आपल्याला ओळख पटेल व ते आकाशात कसे फिरत आहे ते आपल्याला कळेल. इतर नक्षत्रांबाबत शिकतांना मृग नक्षत्राची ओळख खूप उपयोगी ठरते.
-------------------------------------------------------------------------------------
शनिवार, 14 फ़रवरी 2009
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
1 टिप्पणी:
?
एक टिप्पणी भेजें