मनु आणी नोहा
दै, लोकमत मधे दि 28 फेब्रु.2009 रोजी प्रकाशित
माणसाच्या आयुष्याच्या तुलनेत पृथ्वीचे आयुष्य खूपखूप मोठे आहे. अगदी अब्जावधी वर्षांचे. या आयुष्यात कित्येक उलाढाली होत राहतात. प्रलय काळ ही पण अशीच एक उलाढाल मानली जाते. प्रलय काळाच्या कित्येक भारतीय व ग्रीक पूराण कथा आपल्याला वाचायला मिळतात. त्यातीलच एक कथा मनू राजाची. एकदा मनू राजा नदीत आंघोळ करत असताना एक पिटुकला मासा त्याच्या जवळ येऊन म्हणाला “एवढया मोठया नदीत मी घाबरतो म्हणून तू मला उचलून एखादया छोटयाशा ठिकाणी सुरक्षित ठेव.” मनू राजाने माश्याला ओंजळीत उचलून घेतले आणि एका छोटया भांडयात ठेवुन दिले. चार दिवसातच तो मासा मोठा झाला आणि मनू राजाला म्हणाला आता तू मला थोडया मोठया जागेवर नेऊन ठेव. मग मनूने त्याला एका छोटया तलावात नेऊन ठेवले. काही दिवसांनी मासा तेथेही मोठा झाला. त्याच्या आग्रहावरुन मनूने त्याला एका मोठया तलावात ठेवले.
अशा प्रकारे मासा वाढतच राहिला आणि मनू राजा त्याला लहान पाण्यातून मोठया पाण्यात ठेवत राहिला. शेवटी मासा इतका मोठा झाला की, त्याने मनूला मला समुद्रात नेऊन सोड असा आग्रह धरला. मनूने त्याप्रमाणे केले.
काही वर्षानंतर तो मासा पुन्हा मनूकडे आला आणि म्हणाला “राजा लवकरच मोठा जलप्रलय येणार आहे. त्यावेळी ही सर्व पृथ्वी पाण्याखाली बुडेल म्हणून तू आताच तयारीला लाग. एक मोठी नाव बनव. खूपशा झाडांच्या बिया गोळा कर. सर्व प्रकारचे प्राणी पक्षी आपल्याबरोबर घे आणि समुद्र किनारी येऊन मला हाक मार म्हणजे मी तुझ्या मदतीला येईन.” मनूने त्याप्रमाणे केले. जलप्रलय सुरु झाल्यानंतर मासा मनूच्या नावेजवळ आला. एव्हाना तो मासा खूप मोठा होऊन त्याला एक शिंगही उगवले होते. मनूने माश्याच्या शिंगाला आपली नाव बांधली. माश्याकडे अफाट शक्ती होती. एवढया मोठया जलप्रलयातही तो नाव ओढत घेऊन गेला. एका उंच पर्वताचे फक्त शेवटचे टोकच बुडायचे शिल्लक राहिले होते. त्या टोकाला मनू राजाची नाव नेऊन बांधली. बर्याच दिवसांनी जलप्रलय ओसरल्यावर मनूने त्याच्या बरोबर आणलेले सर्व पशुपक्षी, प्राण्यांच्या प्रजाती, माणसे आणि झाडांच्या बिया यांच्या सहाय्याने पुन्हा पृथ्वीवर नवीन संसार उभारला. या गोष्टीतील नावेलाच ग्रीक कथेमध्ये “नोहाज आर्क ” असे म्हटले जाते व ती चांदण्याच्या स्वरुपात आकाशात कुठे दिसते हे मी पुढील अंकात सांगेन.
या गोष्टीवरुन आपल्याला कळते की, पुढील संकटाची चाहूल घेवुन नीट तयारी केली तर संकटानंतरची उभारणी नीट करता येते.
जलप्रलयानंतर थंडीची लाट आणि बर्फ युग येते. त्या काळात खूपसा कार्बन पृथ्वीच्या पोटात दडून राहतो. त्याचे स्वरुप कोळसा, पेट्रोलियम पदार्थ आणि खनिजांचे कार्बोनेट असे असते. पण पृथ्वीच्या वरही कार्बन असतो. घन स्वरुपाचा कार्बन जीवसृष्टी आणि झाडांच्या रुपात राहतो. पण वायु रुपातला कार्बन म्हणजे कार्बनडायऑक्साईड. कार्बन व कार्बनडायऑक्साईडचे संतुलन छान टिकून राहते. जेवढया प्रमाणात घन कार्बन असेल तेवढयाच प्रमाणात कार्बनडायऑक्साईडही असतो. सुमारे दोनशे वर्षापूर्वी पर्यंत हीच स्थिती होती.
परंतु माणसाने एक मोठा प्रश्न निर्माण केला. एकोणीसाव्या शतकात आलेल्या औद्योगिक क्रांतीने चित्र पालटले. आता उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वस्तुंची निर्मिती होउ लागली. यासाठी त्यांना इंधनाची आवश्यकता भासली. म्हणून जमिनीखालून कोळसा काढावा लागला. त्याचबरोबर खनिज पदार्थांचीही आवश्यकता भासली आणि पृथ्वीच्या पोटातून खनीज काढून त्याचे शुध्दीकरण करण्यासाठी फॅक्टरी काढाव्या लागल्या. तिथे धातू तयार होतांना कार्बोनेटच्या रुपातील कार्बन डायऑक्साईड बाहेर पडून परत वातावरणात मिसळू लागला.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच खनिज तेलाचा शोध लागला. जमिनीतून मोठ्या प्रमाणात क्रुड ऑईल पण काढलं जाऊ लागलं. त्यापासून पेट्रोल, डिझेल, केरोसिन. एल.पी.जी.गॅस (घरगुती गॅस) इत्यादी बनविले जाऊ लागले. या इंधनांचा वापर उद्योगधंद्यासाठी, वाहने चालविण्यासाठी तसेच घरगुती वापराकरिता होऊ लागला.
आज जगामध्ये प्रतिवर्षी ३६० कोटी टन खनिज तेल, २०० कोटी टन तेलाच्या इतका गॅस तसेच २४० कोटी टन तेलाइतका कोळसा जमिनीच्या पोटातून बाहेर काढून, तो जमिनीवर आणला जातो. यामुळे पृथ्वीवरील कार्बनमध्ये प्रति दिवशी मोठ्या प्रमाणांत वाढ होत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड मध्येही वाढ होत आहे. त्यामुळे सूर्याची उष्णता अडविली जाउन तापमानही वाढत आहे. मनुष्याकडे कार्बनला हवेमध्ये सोडून देण्याच्या शंभर वाटा आहेत. जास्त कोळसा, जास्त खनिजं आणी जास्त पेट्रोलियम पदार्थांची खपत हे ते उवाय. परंतु परतीचा वाट एकच आहे. ती म्हणजे वृक्ष. ते असतील तरच हे काम होईल. वृक्षांचा आणखी एक फायदा हा आहे की, इंधनासाठी झाडाची लाकडे, पाने उपयोगात येतील व पृथ्वीच्या पोटात असलेला खनिज तेलाचा साठा, कोळसा इत्यादी एवढ्या मोठ्या प्रमाणांत काढावे लागणार नाहीत. म्हणजेच कार्बनला बाहेर न काढता पृथ्वीच्या पोटातच ठेवून आपण वातावरणाला वाचवू शकू.
--------------------------------------------------------------------
मंगलवार, 10 मार्च 2009
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें