मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

बुधवार, 16 फ़रवरी 2011

थंडशार काळोख्या रात्री

13.10.10
थंडशार काळोख्या रात्री
थंडशार काळोखी रात्र असेल, निरभ्र आकाश असेल, शहरांतील सोडियम व्हेपर लॅम्पच्या झगमगाटाने आकाशाला अंधुक करून टाकलेले नसेल, आणि चारी बाजूंनी कॉन्क्रीटच्या जंगलांनी तुमच्या दृष्टिला अडवून धरले नसेल - थोडक्यंत तुम्हाला आकाशांत चांदण्यांचा खच पडलेला दिसू शकत असेल तर अहाहा, किती बहारहार दृश्य असते ते !
अगदी चांदण्यांचा खच पडलेला नसू दे, पण निदान ठळक ठळक चांदण्या जरी दिसल्या तरी आपले कुतूहल जागे होते.कोण आहेत हे तारे, ही नक्षत्र कुठून आले कुतूहलानंतरची पुढली पायरी असते ओळखीची, सामीप्याची. यातली कुठली चांदणी आपल्या ओळखीची आहे? कुणाला आधी पाहिले होते का ? आणि सर्व सारक्याच दिसणा-या चांदण्यांमधे ही किंवा ती ओळखायची तरी कशी? मग एखादीला विचारावेसे वाटते - "कोण गं तू ? तुझे नांव कांय? चल तूच आता सांग ना ! "

मग चला तर. दुर्बीण न घेता आकाशातील ज्या चांदण्या आपल्याला डोळ्यांनी सहज दिसतात त्यांच्या बद्दल थोडसं (बरचसं) जाणून घेऊ या. आकाशांत दिसतात त्या चांदण्या ग्रह आणि तारे या दोन सदरांत मोडतात हे तुम्हाला माहीत असेल. पण ग्रहांबद्दल फारशी काळजी करायची नाही. आपत्याला फक्त शुक्र, गुरू, शनि व मंगल या चारच ग्रहांच्या चांदण्या डोळ्यांना दिसतात (बुध इतका छोटा दिसतो की तो न मोजून चालेल.) इतर सर्व तारकाच असतात.

प्रत्येक चादणी पंचकोणी आणि म्हणून सारखीच हे खरे, पण त्यांचा आकार लहान-मोठा असतो. कुणी लखलखीत असेल तर कुणी मद्धिम. कुणी शुभ्र पांढ-या रंगाची तर कुणी पिवळसर किंवा तांबूस झाक घेतलेली असेल.
आधी आकाशातल्या मोठया चांदण्यांची नांव पाहू या. शुक्राची चांदणी सर्वात मोठी. इतकी की चंद्र नसेल तर गडद अंधारात शुक्राचा उजेड पुरेसा असतो. ही निळसर शुभ्र असते. हिच्या पाठोपाठ व्याध, गुरु, शनि, अभिजित, अगस्ति, स्वाति, चित्रा, मूळ, या नऊ चादण्या आकाशातील मोठ्या चांदण्या आहेत.
ग्रह आणि तारे यात फरक कांय? हा प्रश्न चौथी पाचवीच्या भूगोलांत नेहमी विचारतात आणि आपण उत्तर देतो की तारे लुकलुकतात, ग्रह लुकलुकत नाहीत तर स्थिर, मंद प्रकाश देतात.
पण या उत्तराचा पुढचा भाग आपल्याला सहसा वाचायला मिळत नाही. सर्व तारे एकमेकांच्या सापेक्ष एकाच अंतरावर दिसतात. एकमेकांच्या सापेक्ष त्यांची जागा बदलत नाही. पण ग्रहांचे तसे नाही. ते नक्षत्रमालिकेतून भ्रमण करतात असं भासते. आपल्याला ते एका नक्षत्रातून पुढच्या नक्षत्रांत गेलेले दिसतात. हा तारे आणि ग्रहांमधला मोठा फरक आहे.
तारे एकमेकंशी जे अंतर ठेऊन असतात त्यामुळे आकाशांत एखादी आकृति तयार होते - तिची ओळख पटली की ती सुंदर दिसू लागने - त्या आकृतीवरून आपण चांदण्यांना ओळखतो. एरवी तुम्ही म्हटलं असतं की प्रत्येक चांदणी पंचकोणीच दिसते मग सुंदर चांदणी म्हणजे कांय? पण तस नाही - काही आकृत्या खरच खूप छान दिसतात.

मोठ्या नऊ चांदण्यांपेक्षा जराशा लहान पण तेजस्वी अशा कांही खूप सुंदर चांदण्या आहेत. मंगळ, सप्तर्षिच्या सात चांदण्या, रोहिणी, ब्रह्महृदय, मघा, श्रवण, हंस, अल्फा आणि बीटा सेंटॉरी, पुनर्वसु अशा 30-40 चांदण्या अहेत ज्यांना मी दुस-या क्रमावर मोजते.

भारतीय खगोल शास्त्र एकेकाळी खूप प्रगत होते. अजूनही आहे. आपल्या पूर्वजांनी आकाशांतल्या कित्येक आकृत्यांना नांव देऊन ठेवली आहेत. त्यांना आपण नक्षत्र म्हणतो. त्यांचा क्रम पाठ करुन ठेवला तर रात्री चांदण्या ओळखायला मदत होते. सत्तावीस नक्षत्रांची नांवे अशी - अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, व रेवती. याच क्रमाने ही नक्षत्र आकाशांत दिसतात., म्हणून हा क्रम लक्षांत ठेवण्याचे फायदे आहेत.
------------------------------------------------------------------------------






कोई टिप्पणी नहीं: